33.4 C
New Delhi
Sunday, June 14, 2026
HomeTop Five Newsताम्हिणी घाटाला सुरक्षित पर्याय मिळणार?

ताम्हिणी घाटाला सुरक्षित पर्याय मिळणार?

बोगदा व नव्या मार्गावर एनएचएआयची हालचाल

पुणे : पुणे आणि कोकणाला जोडणारा सर्वात जवळचा, निसर्गरम्य पण तितकाच धोकादायक मार्ग म्हणून ओळखला जाणारा ताम्हिणी घाट भविष्यात अधिक सुरक्षित आणि वेगवान करण्याच्या दृष्टीने प्रशासकीय हालचालींना वेग आला आहे. पावसाळ्यात होणाऱ्या दरडी, अरुंद रस्ते आणि वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने, या घाटाला पर्यायी मार्ग किंवा बोगदा उभारण्याचा आराखडा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) तयार केला जात आहे.

ताम्हिणी घाटाला सुरक्षित आणि प्रशस्त पर्याय उपलब्ध झाल्यास पुणे ते रायगड जिल्ह्यातील दिघी पोर्ट तसेच माणगाव औद्योगिक क्षेत्राशी संपर्क अधिक सुलभ होणार आहे. सध्या पुणे–चांदणी चौक–पौड–ताम्हिणी–माणगाव–दिघी असा मार्ग वापरला जातो. पुणे ते दिघी पोर्ट या मार्गाला केंद्र सरकारने आधीच राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा दिला आहे. मात्र ताम्हिणी घाटातील नागमोडी वळणे आणि अरुंद रस्त्यांमुळे या मार्गावर वेळ आणि जोखीम दोन्ही वाढतात.

दिघी पोर्टसारख्या महत्त्वाच्या बंदरापर्यंत जड मालवाहतूक सुरळीत होण्यासाठी प्रशस्त आणि सुरक्षित मार्गाची आवश्यकता आहे. त्यामुळे पुण्याहून कोकणात जलद आणि सुरक्षित प्रवास शक्य व्हावा, या उद्देशाने एनएचएआयकडून ताम्हिणी घाटाला पर्यायी मार्गाचा गांभीर्याने विचार सुरू आहे.

प्राधिकरणासमोर सध्या दोन प्रमुख पर्याय विचाराधीन आहेत. पहिला पर्याय म्हणजे ताम्हिणी घाट टाळून पानशेत मार्गे माणगाव–दिघी पोर्ट असा नवीन रस्ता विकसित करणे. दुसरा पर्याय म्हणजे सध्याच्या घाटरस्त्याचे रुंदीकरण करून तीव्र वळणे कमी करणे आणि डोंगरवाडी ते ताम्हिणी दरम्यान बोगदा मार्ग तयार करणे. या दोन्ही पर्यायांमुळे घाटातील प्रवासाचे अंतर कमी होऊन वेळ वाचणार आहे.

एनएचएआयकडून घाटरस्त्याचे अंतर कमी करणे आणि प्रवास अधिक सुखकर व सुरक्षित करणे, यावर विशेष भर देण्यात येत आहे. त्यानुसार प्राथमिक माहिती संकलन आणि नव्या मार्गाची आखणी सुरू करण्यात आल्याचे प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

ताम्हिणी घाटाला पर्याय का आवश्यक?

ताम्हिणी घाटात अनेक तीव्र आणि नागमोडी वळणे आहेत. पावसाळ्यात येथे मुसळधार पाऊस पडत असल्याने दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडतात. विशेषतः शनिवार आणि रविवारी पर्यटकांच्या गर्दीमुळे या घाटात लांबच लांब वाहनांच्या रांगा लागतात. अरुंद रस्ते आणि तीव्र वळणांमुळे अवजड वाहनांचे अपघात होण्याचे प्रमाण वाढले असून, ओव्हरटेक करणेही धोकादायक ठरते. मालवाहतुकीची मोठी वाहने वळविताना चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर ताम्हिणी घाटाला सुरक्षित, प्रशस्त आणि आधुनिक पर्याय मिळाल्यास पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाच्या विकासाला मोठी चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
33.4 ° C
33.4 °
33.4 °
33 %
1.8kmh
0 %
Sun
42 °
Mon
42 °
Tue
42 °
Wed
40 °
Thu
41 °

Most Popular

Recent Comments