39.9 C
New Delhi
Thursday, June 11, 2026
HomeTop Five Newsपुणे रेल्वे स्थानक होणार १२ फलाटांचे

पुणे रेल्वे स्थानक होणार १२ फलाटांचे

‘आउटर’ला रामराम! ; विस्तारकामाला वेग

पुणे : प्रवाशांची झपाट्याने वाढणारी संख्या आणि नव्या रेल्वेगाड्यांची वाढती मागणी लक्षात घेऊन पुणे येथील रेल्वे स्थानकाच्या विस्तारीकरणाला वेग देण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या सहा प्लॅटफॉर्ममध्ये आणखी सहा नव्या फलाटांची भर पडणार असून, पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म क्रमांक ११ आणि १२ च्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. या प्रकल्पामुळे स्थानकाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार असून, गाड्यांना ‘आउटर’वर थांबण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.

शहराचा विस्तार आणि प्रवाशांची वाढती संख्या पाहता देशभरातून पुण्याकडे नव्या गाड्या सुरू करण्याची मागणी सातत्याने होत आहे. मात्र, मर्यादित जागा आणि अपुऱ्या प्लॅटफॉर्ममुळे रेल्वे प्रशासनाला अडचणींचा सामना करावा लागत होता. हीच समस्या लक्षात घेऊन केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी वर्षभरापूर्वी पुणे स्थानकाची पाहणी करत विस्तारीकरणाचे निर्देश दिले होते. त्यानुसार आता ४४.०९ कोटी रुपयांच्या निधीसह संपूर्ण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी प्लॅटफॉर्म ९ ते १२ दरम्यान सुमारे ४०० मीटर लांबीचे ‘कव्हर ओव्हर प्लॅटफॉर्म’ उभारण्यात येणार आहे. यामुळे ऊन, पाऊस यापासून प्रवाशांचे संरक्षण होईल. तसेच प्रत्येक फलाटावर आधुनिक स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा आणि सर्व फलाटांना जोडणारे पादचारी पूल (एफओबी) उभारले जाणार आहेत. या कामांमुळे स्थानक अधिक आधुनिक आणि प्रवासीस्नेही बनणार आहे.

या विस्तारीकरणातील सर्व नवीन सहा प्लॅटफॉर्म ‘आयलँड’ पद्धतीचे असतील. म्हणजेच एका फलाटाच्या दोन्ही बाजूंना गाड्या थांबू शकतील. त्यामुळे प्रवाशांना चढ-उतार करणे अधिक सुलभ होणार असून गर्दीचे व्यवस्थापनही अधिक प्रभावीपणे करता येईल. यामुळे प्लॅटफॉर्मवरील ताण कमी होऊन सुरक्षिततेतही वाढ होणार आहे.

कामाच्या पहिल्या टप्प्यात प्लॅटफॉर्म ११ आणि १२ उभारले जात असून यासाठी १५.३२ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हे फलाट सुमारे ६०० मीटर लांबीचे आणि १३ मीटर रुंद असतील, आणि पुढील दोन महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसऱ्या टप्प्यात प्लॅटफॉर्म ९ आणि १० साठी १८.३८ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, हा सुमारे ७५० मीटर लांबीचा सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म असेल. येथे २४ डब्यांच्या गाड्या सहज उभ्या राहू शकतील.

तिसऱ्या टप्प्यात प्लॅटफॉर्म ७ आणि ८ साठी १०.३९ कोटी रुपयांचा निधी निश्चित करण्यात आला असून, या फलाटांची लांबी सुमारे ६५० मीटर आणि रुंदी १० मीटर असणार आहे. या तिन्ही टप्प्यांचे काम पुढील एका वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

या संपूर्ण प्रकल्पामुळे पुणे रेल्वे स्थानकाची क्षमता दुप्पट होणार आहे. परिणामी, नवीन गाड्या सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल आणि प्रवाशांना अधिक जलद व सोयीस्कर सेवा मिळेल. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर हे विस्तारीकरण पुणेकरांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
clear sky
39.9 ° C
39.9 °
39.9 °
19 %
2.6kmh
0 %
Wed
40 °
Thu
42 °
Fri
42 °
Sat
41 °
Sun
43 °

Most Popular

Recent Comments