38.2 C
New Delhi
Monday, July 27, 2026
HomeBlogअखेर पडदा उघडला! ओमराजेंनी जाहीर केली नवी राजकीय दिशा

अखेर पडदा उघडला! ओमराजेंनी जाहीर केली नवी राजकीय दिशा

धाराशिव : गेल्या काही दिवसांपासून धाराशिवच्या राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. उपमुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असून शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी अधिकृत घोषणा त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर केली.

धाराशिव तालुक्यातील गोवर्धन वाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका जाहीर केली. यापूर्वी त्यांनी मतदारसंघातील कार्यकर्ते, पदाधिकारी, समर्थक आणि नागरिकांशी सविस्तर चर्चा केली होती. जवळपास चार तास चाललेल्या बैठकीत विविध स्तरांवरील कार्यकर्त्यांनी आपली मते मांडली. त्यानंतर सर्वांच्या भावना आणि मतांचा आदर करत आपण हा निर्णय घेत असल्याचे ओमराजे यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मतदारसंघातील सामान्य नागरिकांची अनेक कामे केवळ सत्तेअभावी रखडत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने प्रयत्न करूनही अनेक प्रश्न मार्गी लावता येत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. धाराशिव लोकसभा मतदारसंघातील नागरिकांशी संवाद साधल्यानंतर आणि कार्यकर्त्यांच्या सूचनांचा विचार केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.

ओमराजे निंबाळकर म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अपेक्षित यश मिळाले नाही. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, लोकांना वेळ दिला, त्यांच्यासाठी काम केले; मात्र सत्तेच्या समीकरणांचा परिणाम अनेक निवडणुकांमध्ये दिसून आला. त्यामुळे काही वेळा पराभवाचाही सामना करावा लागला. मतदारसंघाच्या विकासासाठी आणि नागरिकांची कामे प्रभावीपणे करण्यासाठी सत्तेशी समन्वय आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी अधोरेखित केले.

राजकीय भूमिका बदलत असताना त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. त्यांच्या राजकीय प्रवासात या तिन्ही नेत्यांचा स्नेह आणि मार्गदर्शन लाभल्याचे सांगताना त्यांनी भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या.

“बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्याबद्दल माझ्या मनात सदैव आदर राहील. भविष्यात त्यांच्या विरोधात काहीही बोलले गेले किंवा राजकीय टीका झाली तरी माझ्याकडून त्यांच्याविषयी एकही अपशब्द उच्चारला जाणार नाही. त्यांनी मला दिलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल मी त्यांचा सदैव ऋणी राहीन,” असे ओमराजे यांनी स्पष्ट केले.

यावेळी त्यांनी पवनराजे निंबाळकर खून प्रकरणाचाही उल्लेख केला. त्या प्रकरणामध्ये राजकीय वैमनस्य असल्याचे न्यायालयाने मान्य केले होते, असे सांगत त्यांनी निकालाबाबतची खंत व्यक्त केली. तो काळ त्यांच्या कुटुंबासाठी अत्यंत वेदनादायी असल्याचे त्यांनी नमूद केले. त्या कठीण काळात काही मोजकीच माणसे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली होती, असे सांगताना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा उल्लेख केला.

न्यायालयाचा निकाल लागल्यानंतर फडणवीस आणि शिंदे यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा झाल्याचे सांगत त्यांनी न्यायासाठी लढण्याच्या भूमिकेला या नेत्यांनी पाठिंबा दिल्याचे नमूद केले. या पार्श्वभूमीवर महायुतीसोबत काम करण्याचा निर्णय अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, महायुतीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असला तरी काही राजकीय विरोध कायम राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “महायुतीतील पक्षात प्रवेश केला म्हणजे सर्व मतभेद संपले असे नाही. काही नीच प्रवृत्तीच्या लोकांविरोधातील माझी भूमिका कायम राहील,” असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या राजकीय विरोधकांवर निशाणा साधला.

विशेष म्हणजे, त्यांनी माजी मंत्री राणा जगजितसिंह पाटील यांच्याशी असलेला राजकीय संघर्ष आणि विरोध कायम राहील, असे स्पष्ट शब्दांत सांगितले. त्यामुळे शिंदेसेनेत प्रवेश करूनही धाराशिवच्या राजकारणातील काही समीकरणे बदलणार नसल्याचे संकेत त्यांनी दिले.

ओमराजे निंबाळकर यांच्या या निर्णयामुळे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच इतर राजकीय घडामोडींवर या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कार्यकर्त्यांच्या सल्ल्यानुसार घेतलेला हा निर्णय असल्याचा दावा ओमराजे यांनी केला असला तरी त्यांच्या नव्या राजकीय वाटचालीकडे राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

एकीकडे ठाकरे कुटुंबाविषयी आदर कायम ठेवत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची घोषणा करत ओमराजे निंबाळकर यांनी आपल्या राजकीय प्रवासातील नवे पर्व सुरू केले आहे. धाराशिवच्या राजकारणात या निर्णयाचे पडसाद आगामी काळात अधिक स्पष्टपणे उमटणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
broken clouds
38.2 ° C
38.2 °
38.2 °
35 %
1.6kmh
73 %
Mon
39 °
Tue
38 °
Wed
33 °
Thu
34 °
Fri
37 °

Most Popular

Recent Comments