Sugar News | राज्यात साखरेच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळत असून घाऊक आणि किरकोळ बाजारात भावांनी उच्चांकी पातळी गाठली आहे. गेल्या महिनाभरात घाऊक बाजारात प्रति क्विंटल सुमारे ४०० ते ४५० रुपयांची वाढ झाली असून त्याचा थेट परिणाम किरकोळ बाजारावरही झाला आहे. परिणामी किरकोळ विक्रीत साखर प्रतिकिलो ६ ते ७ रुपयांनी महागली असून अनेक ठिकाणी मोठ्या साखरेचा दर ४९ ते ५१ रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. श्रावणासह आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर ही दरवाढ सर्वसामान्य ग्राहकांसाठी चिंतेची बाब ठरत आहे. (sugar)
साखरेच्या वाढत्या दरामागे अनेक कारणांचा परिणाम असल्याचे व्यापारी आणि साखर उद्योगातील तज्ज्ञांचे मत आहे. केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी देशांतर्गत विक्रीसाठीचा साखर कोटा कमी केल्याने बाजारातील उपलब्ध साखरेचा पुरवठा मर्यादित झाला आहे. त्याचवेळी २०२५-२६ च्या गळीत हंगामात साखर उत्पादनात मोठी घट झाल्याने कारखान्यांकडील साठाही कमी झाला आहे. मागील हंगामात देशात सुमारे २७७ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते, तर यंदा ते १९९ लाख टनांवर घसरल्याने बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात जून आणि जुलै महिन्यात अनेक भागांत अपेक्षेपेक्षा कमी पाऊस झाल्याने उसाच्या पिकाच्या वाढीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे पुढील गळीत हंगामातही साखर उत्पादनात २० ते २५ टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता उद्योग क्षेत्रातून व्यक्त करण्यात येत आहे. उत्पादन घटण्याची भीती आणि उपलब्ध साठा कमी असल्याने व्यापारी आगाऊ खरेदी करत असून त्यातून बाजारातील तेजी अधिक वाढल्याचे चित्र आहे.
येत्या काही आठवड्यांत श्रावण, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा आणि दिवाळी या प्रमुख सणांचा कालावधी सुरू होत आहे. या काळात मिठाई, फराळ, बेकरी आणि खाद्यपदार्थ उद्योगाकडून साखरेची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे मागणी आणि पुरवठ्यातील तफावत आणखी वाढून दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
घाऊक व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कमी उत्पादन, मर्यादित विक्री कोटा आणि आगामी हंगामाबाबतची अनिश्चितता यामुळे कारखान्यांकडूनच साखर अधिक दराने मिळत आहे. त्यामुळे किरकोळ विक्रेत्यांनाही वाढीव दराने खरेदी करावी लागत असल्याने ग्राहकांपर्यंतही ही दरवाढ पोहोचत आहे.
दुसरीकडे, साखर कारखान्यांचे म्हणणे आहे की, काही महिन्यांपूर्वी साखर उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात विकावी लागत होती. आता दरात सुधारणा झाली असली, तरी उत्पादन खर्च, वाहतूक, ऊर्जा आणि ऊस खरेदीचा वाढलेला खर्च लक्षात घेता किमान ४,३०० रुपये प्रति क्विंटल दर मिळणे आवश्यक असल्याचे कारखानदारांचे मत आहे.
केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या प्राईस मॉनिटरिंग सिस्टिमनुसार देशातील प्रमुख शहरांमध्ये साखरेसह २२ अत्यावश्यक वस्तूंच्या घाऊक आणि किरकोळ दरांवर नियमित नजर ठेवली जाते. या आकडेवारीवरून गेल्या चार दशकांत साखरेच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ झाल्याचे दिसून येते. १९८५ मध्ये प्रतिकिलो ५.५० ते ६.५० रुपये दराने मिळणारी साखर २०२५-२६ मध्ये ४६ ते ४८.७० रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचली होती. आता अनेक शहरांमध्ये हा दर ५१ रुपयांपर्यंत गेला आहे.
उत्पादनातील घट, मर्यादित उपलब्धता आणि वाढती मागणी या तिन्ही घटकांचा एकत्रित परिणाम बाजारावर दिसून येत असून, आगामी सणासुदीच्या काळात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे घरगुती ग्राहकांसह मिठाई उद्योग, हॉटेल व्यवसाय आणि खाद्यपदार्थ उत्पादकांनाही वाढत्या खर्चाचा सामना करावा लागू शकतो.


