डॉ. स्मृती हिंदारिया यांची ऐतिहासिक कामगिरी; अत्यल्प चिरफाड, जलद पुनर्वसन आणि अधिक सुरक्षित उपचारपद्धतीमुळे रुग्णांना दिलासा
पुणे : अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाच्या दिशेने पुणे शहराने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. शहरात प्रथमच रोबोटिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हृदयावरील बायपास शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली असून, या क्षेत्रात महत्त्वाची कामगिरी करणाऱ्या डॉ. स्मृती हिंदारिया या पुण्यातील पहिल्या तसेच भारतातील रोबोटिक हृदयशस्त्रक्रिया करणाऱ्या पहिल्या महिला हृदयरोग शल्यविशारद ठरल्या आहेत. अपोलो रुग्णालयात अवघ्या एका महिन्याच्या कालावधीत सहा रुग्णांवर यशस्वी रोबोटिक हृदय शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. (operation)
पारंपरिक ओपन हार्ट सर्जरीमध्ये छातीचे हाड पूर्णपणे उघडावे लागते. मात्र, रोबोटिक पद्धतीमध्ये अत्यंत लहान छिद्रांद्वारे शस्त्रक्रिया केली जाते. त्यामुळे रुग्णाला कमी वेदना होतात, रक्तस्राव कमी होतो, संसर्गाचा धोका घटतो आणि रुग्ण लवकर दैनंदिन आयुष्यात परतू शकतो. विशेषतः कामकाजी व्यक्ती, तरुण आणि खेळाडूंसाठी ही उपचारपद्धती अधिक फायदेशीर ठरत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
डॉ. स्मृती हिंदारिया यांनी सांगितले की, या शस्त्रक्रियेसाठी अमेरिकेतील अत्याधुनिक ‘दा व्हिन्सी इंट्युटिव्ह सर्जिकल सिस्टीम’चा वापर केला जात आहे. सध्या महाराष्ट्रात पुणे, मुंबई आणि नागपूर येथेच ही सुविधा उपलब्ध असून, पुण्यात प्रथमच हृदयावर रोबोटिक शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सुरुवातीच्या टप्प्यात रोबोटिक सहाय्याने बायपास शस्त्रक्रिया केली जात असून, पुढील काही महिन्यांत हृदयाच्या झडप बदलण्याच्या (व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट) तसेच हृदयातील जन्मजात छिद्र (एएसडी) बंद करण्याच्या शस्त्रक्रियाही या तंत्रज्ञानाद्वारे सुरू करण्यात येणार आहेत.
रोबोटिक हृदयशस्त्रक्रिया करण्यासाठी विशेष प्रशिक्षण आवश्यक असते. डॉ. हिंदारिया यांनी गेल्या दोन वर्षांत या तंत्रज्ञानाचे सखोल प्रशिक्षण घेतले आहे. त्याआधी त्यांनी चार वर्षांच्या कालावधीत ४०० हून अधिक मिनिमली इन्व्हेसिव्ह हृदयशस्त्रक्रिया केल्या आहेत. त्यानंतर रोबोटिक कन्सोलवर ६० ते ७० तासांचे सिम्युलेटर प्रशिक्षण आणि विशेष मॉडेलवर प्रत्यक्ष कौशल्य चाचण्या पूर्ण करून त्यांनी आवश्यक प्रमाणपत्रे मिळवली.
शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाच्या सुरक्षिततेसाठी ट्रान्सइसोफेजियल इकोकार्डिओग्राफी, आर्टेरियल लाईन्स तसेच अत्याधुनिक मॉनिटरिंग प्रणालींचा वापर केला जातो. शस्त्रक्रियेनंतर दोन आठवडे, तीन महिने आणि सहा महिन्यांनी नियमित तपासणी केली जाते. सहा महिन्यांनंतर स्ट्रेस टेस्टद्वारे हृदयाची कार्यक्षमता तपासली जाते.
तज्ज्ञांच्या मते, एकाच रक्तवाहिनीत साधा अडथळा असल्यास अँजिओप्लास्टी प्रभावी ठरू शकते. मात्र, रक्तवाहिनी पूर्णपणे बंद झालेली असल्यास, कॅल्शियमचे प्रमाण अधिक असल्यास किंवा रक्तवाहिन्यांची रचना गुंतागुंतीची असल्यास बायपास शस्त्रक्रिया अपरिहार्य ठरते. तसेच ४५ वर्षांवरील, मधुमेह किंवा उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये लक्षणे नसतानाही स्ट्रेस टेस्टमध्ये धोका आढळल्यास भविष्यातील हृदयविकार टाळण्यासाठी शस्त्रक्रिया किंवा अँजिओप्लास्टीचा सल्ला दिला जातो.
या आधुनिक उपचारपद्धतीला रुग्णांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. विशेषतः तरुण रुग्ण आणि खेळाडू अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा नियमित जीवनशैलीकडे परतत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याशिवाय काही विमा कंपन्यांनी रोबोटिक हृदयशस्त्रक्रियेला विमा संरक्षण देण्यास सुरुवात केली असून, लवकरच आणखी विमा योजनांमध्ये या उपचाराचा समावेश होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
वैद्यकीय क्षेत्रात रोबोटिक तंत्रज्ञानाचा वाढता वापर ही उपचारपद्धती अधिक अचूक, सुरक्षित आणि रुग्णाभिमुख बनवत आहे. पुण्यात सुरू झालेली ही सुविधा भविष्यात राज्यातील हृदयरुग्णांसाठी आधुनिक उपचाराचा नवा पर्याय ठरणार असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.


