28 C
New Delhi
Friday, July 10, 2026
Homeमहाराष्ट्रसद्गुरूच्या रूपाने साक्षात परब्रह्माची ज्योत तेवत असतेस्वामी गोविंद देव गिरीजी महाराज

सद्गुरूच्या रूपाने साक्षात परब्रह्माची ज्योत तेवत असतेस्वामी गोविंद देव गिरीजी महाराज


पुणे : सद्गुरू कधीच केवळ देह नसतात. ते देहाच्या पलीकडचे असतात. कृपान्वित चैतन्याचा तो प्रवाह आहे. ते ज्याच्या त्याच्या साधनेप्रमाणे प्रकट होतात. आपण विनाकारण गुरूंची तुलना करतो. सद्गुरू हे शक्तीचे नाव आहे. अशा प्रकारच्या गुरु तत्त्वाची आराधना केल्याशिवाय, त्याला समर्पित केल्याशिवाय आपल्याला आध्यात्मिक प्रगती करता येत नाही. हा सगळा शास्त्राचा निर्वाळा आहे. सद्गुरूच्या रूपाने साक्षात परब्रह्माची ज्योत तेवत असते. त्याच्याशी आपण एकरूप होत असतो. अनुभूतीची सगळ्यात मोठी आनंदाची ही स्थिती असते. त्या शक्तीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, असे मत श्रीराम जन्मभूमि न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी व्यक्त केले.

प.पू. वामन दत्तात्रेय गुळवणी महाराज यांच्या ‘मोअर दॅन अ गुरु’ या श्रीनिवास दत्तात्रेय आचार्य यांनी लिहिलेल्या प्रथम इंग्रजी चरित्राचा त्यांच्या कन्या नंदिनी आचार्य यांनी केलेला मराठी अनुवाद ‘गुरूपेक्षाही अधिक’ या पुस्तकाचे प्रकाशन कोथरूड मयूर कॉलनी येथील एम.ई.एस. ऑडिटोरियम बालशिक्षण मंदिर सभागृह येथे झाले. यावेळी गुरुबाबा औसेकर महाराज, ज्येष्ठ साहित्यिक डॉ.न.म. जोशी, गुळवणी महाराज आश्रम वासुदेव निवासाचे प्रधान विश्वस्त शरदशास्त्री जोशी, डॉ. शैलेश गुजर, प्रसन्न जोशी, आयोजिका नंदिनी आचार्य व नागेश्री आचार्य, उत्कर्ष प्रकाशानाचे सु.वा. जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

गोविंद देव गिरी महाराज म्हणाले, या अध्यात्ममार्गात, भगवंताच्या प्राप्तीच्या मार्गात, या प्रवासातला सर्वात मोठा सांगाती जर कोणी असेल, तर तो केवळ सद्गुरू हाच असतो. त्याच्या कृपेशिवाय आपल्याला पुढे जाता येत नाही. जाणत्याने सद्गुरूची साथ धरावी.

आपण किती भाग्यवान लोक आहोत! खरोखरी मराठी भाषेतले आध्यात्मिक वाङ्मय, मराठी भाषेतले आध्यात्मिक साहित्य जितके आहे, माझी स्वतःची धारणा आहे आणि ती चुकीची असल्याचा संभव नाही, जगाच्या पाठीवर कुठल्याही भाषेला हे वैभव लाभलेले नाही. हे मराठीला लाभलेले आहे. तितके साहित्य मराठी भाषेत आहे.

गुरुबाबा औसेकर महाराज म्हणाले, व्यक्तिगत जीवनात प्रगती करण्यासाठी परमेश्वराची कृपा आणि सद्गुरूंचा आशीर्वाद आवश्यक असतो. कृपा आणि आशीर्वाद या जगातील सर्वात अमूल्य गोष्टी आहेत. त्यांची किंमत पैशाने मोजता येत नाही. मनुष्याने मनोभावे आणि निष्काम भावनेने सेवा केली पाहिजे. सेवेमुळेच कृपा आणि आशीर्वाद प्राप्त होतात. आजच्या भौतिकवादी युगात माणसाने अनेक सुखसुविधा आणि संपत्ती मिळवली आहे.

ते पुढे म्हणाले, जग वैभवाने नटलेले दिसते. परंतु सर्व काही प्राप्त झाल्यानंतरही मनुष्याला अंतःकरणातील शांती, समाधान आणि आनंद हवा असतो. हे खरे समाधान सद्गुरूनाथांच्या चरणीच प्राप्त होते. सुज्ञ माणसाने सदैव गुरुजनांचा आश्रय घ्यावा. जीवनात सेवेला कोणताही शॉर्टकट नसतो. सेवा, श्रद्धा आणि समर्पण यांद्वारेच आध्यात्मिक उन्नती साधता येते. गुरुतत्त्व हे सर्वश्रेष्ठ तत्त्व असून, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखालीच जीवनाला योग्य दिशा आणि खरा अर्थ प्राप्त होतो.

डॉ. न. म. जोशी म्हणाले, सद्गुरू गुळवणी महाराज, आचार्य आणि माझ्यामध्ये एक समान धागा आहे. आम्ही तिघेही नू. म. वि. विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत होतो. ही महान व्यक्तिमत्त्वे तमोयुगातील प्रकाशाची बेटे ठरली आहेत.

शरद शास्त्री जोशी म्हणाले, महान गुरुपरंपरेतून घडलेले गुळवणी महाराज हे विलक्षण व्यक्तिमत्त्व होते. आचार्यांचे उद्गारही त्यांच्या महानतेची साक्ष देतात. त्यामुळे त्यांच्या उपदेशाचा प्रसार करणे, त्यांच्या मार्गावर चालणे आणि त्यांनी दिलेल्या साधना-सेवा परंपरेचे जतन करणे हेच खरे गुरुभक्तांचे कर्तव्य आहे. वासुदेव निवासामार्फत आजही हे उत्तुंग कार्य अखंडपणे सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. नंदिनी आचार्य आणि नागेश्री आचार्य यांनी मनोगत व्यक्त केले. नीलिमा वाडेकर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

New Delhi
overcast clouds
28 ° C
28 °
28 °
76 %
2.2kmh
100 %
Thu
28 °
Fri
37 °
Sat
42 °
Sun
42 °
Mon
42 °

Most Popular

Recent Comments