छत्रपती संभाजीनगर : विद्यार्थी आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजित दिपके यांनी भाजपमध्ये प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देत आपण कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. आंदोलनादरम्यान भाजपकडून प्रवेशाची ऑफर देण्यात आली होती, तसेच ती नाकारल्यास परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्याचा दावा त्यांनी केला. याशिवाय, कुटुंबीयांनाही लक्ष्य करण्याची भाषा वापरण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.
पत्रकारांशी संवाद साधताना दिपके म्हणाले की, आंदोलनाच्या काळात “भाजपमध्ये या, अन्यथा ठोकून काढू,” अशा शब्दांत दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला. एवढेच नव्हे, तर आई-वडिलांनाही पाहून घेण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, कोणत्याही दबावाला किंवा आमिषाला बळी न पडता आपण भाजपमध्ये प्रवेश करणार नसल्याची भूमिका त्यांनी पुन्हा स्पष्ट केली.
दिपके यांनी केंद्रातील वरिष्ठ नेतृत्वावरही टीका करत, “मी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या नातवाच्या वयाचा आहे. एका ३० वर्षांच्या तरुणाला किती धमक्या देणार?” असा सवाल उपस्थित केला.
बाबा रामदेव यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया
‘जेन-झी’ पिढी संस्कृती बिघडवत असल्याच्या योगगुरू बाबा रामदेव यांच्या विधानावरही त्यांनी आक्षेप घेतला. आपल्या हक्कांसाठी लढणे ही बदनामी नसून लोकशाहीतील अधिकाराची लढाई असल्याचे सांगत, बाबा रामदेव यांनी सामाजिक भाष्य करण्यापेक्षा आपल्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करावे, असा टोला त्यांनी लगावला.
गृहमंत्र्यांवर निशाणा
आंदोलनाला परदेशातून निधी मिळत असल्याचे आरोप फेटाळताना दिपके म्हणाले, जर असे खरे असेल तर देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शहा यांचे ते अपयश मानावे लागेल. अशा प्रकारचे आरोप करून आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याचेही त्यांनी म्हटले.
नव्या शिक्षणमंत्र्यांवर टीका
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या जागी नियुक्त झालेल्या नव्या शिक्षणमंत्र्यांवरही दिपके यांनी टीका केली. त्यांनी संबंधित मंत्र्यांच्या पूर्वीच्या भूमिकांचा उल्लेख करत सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच सत्ताधारी पक्षाच्या कार्यपद्धतीवरही त्यांनी कठोर शब्दांत टीका केली.
पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्न
आंदोलनादरम्यान तरुण मोबाईलवर चित्रीकरण करत असल्याने पोलिसांना त्याची भीती का वाटते, असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पोलिसांनी संविधानाच्या चौकटीत राहून काम करावे, असे आवाहन केले. तसे होत नसेल तर त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारावा, अशी टीकाही त्यांनी केली.
विरोधकांच्या एकजुटीबाबत मत
विरोधी पक्षांच्या संभाव्य एकजुटीबाबत विचारलेल्या प्रश्नावर दिपके यांनी केंद्रीय तपास यंत्रणांच्या वापराबाबत आरोप करत देशातील लोकशाही संस्थांवर दबाव असल्याचा दावा केला. देशातील लोकशाहीचे चारही स्तंभ सध्या संकटात असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.


