Pune News ऑ पुणे, -: क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भारतातील पहिली मुलींची शाळा सुरू केलेल्या ऐतिहासिक भिडेवाडा येथे उभारण्यात येत असलेल्या राष्ट्रीय स्मारकाची राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी पाहणी केली.(Bhidewada National Memorial)
यावेळी त्यांनी स्मारकाच्या उभारणीची प्रगती, वास्तुरचना तसेच संवर्धनाच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेतला. संबंधित अधिकाऱ्यांनी स्मारकाच्या कामाची सद्यस्थिती, विविध टप्प्यांतील प्रगती आणि पुढील नियोजनाची माहिती मंत्री भुजबळ यांना सादर केली.
भिडेवाडा हे भारतीय समाजसुधारणा आणि स्त्रीशिक्षणाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे प्रेरणास्थान असल्याचे सांगत मंत्री भुजबळ यांनी स्मारकाचे काम ऐतिहासिक वारशाचे जतन करत उच्च दर्जाचे आणि नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
या पाहणीवेळी पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (इस्टेट) प्रजित नायर, शहर अभियंता अनिरुद्ध पावसकर, अधीक्षक अभियंता बिपीन शिंदे, सार्वजनिक बांधकाम (इलेक्ट्रिकल) विभागाच्या मुख्य अभियंता मनीषा शेकटकर, वास्तुविशारद धनंजय साळकर, उपायुक्त अविनाश सकपाळ, माधव जगताप आणि तुषार बाबर उपस्थित होते


